आपण देशभक्त असावं की देशप्रेमी असावं की देशाबद्दल आदर असावा ? देश म्हणजे नेमकं काय असतंय ?

देश बनतो माणसांच्या मनात ,भाषेत ,संस्कृतीत.

देशातली माणस देशाला ओळख देतात आणि देश माणसाला ओळख देतो.

देशातल्या माणसांच्या वागण्याने देश मोठा होतो आणि मोठ्या माणसांच्या देशातल्या माणसांच्या मोठेपणाने देश अजून मोठा होतो आणि हि प्रक्रिया अनंतकाळ चालू असतेय .

माणस भौतिकअर्थाने मोठी होण वेगळ आणि खऱ्या अर्थान माणस म्हणून मोठी होण वेगळ असतय.


हाताची पाची बोट सारखी नसतात, सख्खे भाऊ सारखे नसतात, सगळ्या देशातली माणस सारखी असण फार लांब.

पण मुलभूत मूल्य ,माणुसकी ,समता ,बंधुता ,सहिष्णुता ,एकोपा ह्या गुणांनी माणस एकत्र येऊन समाज घडवतात.

नुसत्या काळ्या ,पांढऱ्या नाही तर त्यातल्या अनंत छटांनी माणस घडतात आणि त्याच रंगात समाज रंगत जातात.

आपापल्या देशाची असणारी प्रतिमा उंचावण हे प्रत्येक माणसाचं ध्येय असतय मग क्षेत्र कुठलही असू देत.

अशी प्रतिमा उंचावताना तुम्हाला तुमच्या देशासाठी असणारी कर्तव्य पार पाडावी लागतात.

देशातले कायदे कानून ,नियम ,संकेत ,सभ्यता कसोशीने पाळावी लागते.

आपल्या देशाची संपत्ती ,देशाची प्रतिमा ,देशाचा लौकिक टिकवायला झगडाव लागत.

त्यासाठी माणसांना सीमेवर जाऊन बंदुका हातात घ्याव्या लागत नाहीत.

रोज दिवस उगवल्यापासून प्रत्येक माणूस जो प्रामाणिकपणे आपली कर्तव्य पार पाडतो , देशातले सगळे कायदे नियम पालन करतो ,आपल्यासोबत बाकीच्यांना अस वागायला प्रेरित करतो तो प्रत्येक माणूस देशाचा सैनिक असतो.

खऱ्या अर्थाने देशभक्त असतो.

देशभक्तीचा हा अर्थ आहे.

तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आणि देशाची प्रतिमा उज्वल करण्यासाठी झटणे ह्याला देशप्रेम म्हणतात.

माझी ,माझ्या समुदायाची असणारी विचारधारा ,माझा समुदाय हाच खरा देशभक्त आहे अस म्हणन , प्रतीकांच्या जंजाळात गुंतून पडताना आपली मुलभूत कर्तव्य सोयीस्करपणे विसरण , आपल्या विरोधातल्या कुठल्याही विचारसरणी ,विरोधातल्या समुदायाला, विरोधातल्या विचारांना अजिबात थारा न देण आणि त्याला निखंदून टाकण्याचे प्रयत्न करण हीच राष्ट्रवादाची लक्षण आहेत.

समाजातली ,भाषेतली,धर्मातली,लिपीमधली,साहित्य,संस्कृती,संगीत,नृत्य,आहार विहार ह्यामध्ये असणारी विविधता मोडून काढून ,सगळ्यावर बुलडोझर फिरवून एकसारख्या छापाची फोटोकॉपी केल्यासारखी सारखी माणस ,संवेदना हरवलेली यंत्र निर्माण करत सगळ्या समाजाच सपाटीकरण करण आणि माझ्या सारखेच सगळे असावेत हा अट्टाहास धरण हा राष्ट्रवाद असतोय.

राष्ट्रवादाला देशभक्तीचा मुलामा देण हा निव्वळ भामटेपणा आहे.

ह्या पूर्णपणे विभिन्न संकल्पना आहेत.

देशभक्ती हि जबाबदारी आणि कर्तव्य सोबत घेऊन येते.

राष्ट्रवादाची आणि जबाबदारी ,कर्तव्यांची फारकत झालेली असतेय.

आता कुठल्याही राजकीय पक्षाला, समुदायाला, धर्माला,जातीला ,भाषेला मध्ये न आणता आपल्याच मनाला प्रश्न विचारा आणि त्याची प्रामाणिक उत्तर द्या.

माझ्या देशातले कायदे ,नियम आणि संकेत मी पाळतो का ?

माझ्या देशाच्या घटनेत असलेल्या हक्क आणि कर्तव्य ह्या दोन्ही बाबींच पालन करतो का ?

माझ्या देशातली संपत्ती माझी स्वत:ची समजून मी तीच रक्षण करतो कि स्वतःची समजून हडप करतो ?

माझ्या विचारसरणी ,माझ्या राजकीय, सामाजिक,धार्मिक विचारांच्या विरोधातल्या माणसांच अस्तित्व मी माझ्या देशात स्विकारतो कि नाकारतो ?

माझ्यापेक्षा भिन्न विचारसरणी ,संस्कृती ,भाषा असलेल्या माणसाला देशाचा नागरिक म्हणून सगळे हक्क मिळावेत आणि त्यानेही सगळी कर्तव्य पाळावीत अस मला वाटत का ?

प्रश्नाची उतर मिळाली कि अजून प्रश्न उभे राहतील.

त्याचीही उत्तर शोधा आणि आपण कोण आहोत ह्याचा शोध घ्या.

आपल्याला आपण कोण आहोत ह्याचा शोध घेण्यापेक्षा उरलेला सगळा देश कसा आहे ह्याचीच जास्त पंचाईत पडलेली आहे आणि हेच आपल दुर्दैव आहे.

आपल आपणच ठरवायचं आहे आपण देशभक्त आहोत कि राष्ट्रवादी आहोत कि राष्ट्रवादी देशभक्त आहोत कि आपण ह्या देशाचे फक्त ग्राहक आहोत ज्यांना फक्त हक्क हवेत पण कुठल्याही जबाबदाऱ्या नकोत.

सध्या गरज आपल्या आत डोकावून पाहण्याची आहे.

साम्यवाद,भांडवलशाही,समाजवाद,लोकशाही,धर्म,राजकारण ह्या फार नंतर शिकण्याच्या आणि समजण्याच्या गोष्टी आहेत.

तूर्त आपल्याला चौथी पाचवी च्या शाळेत शिकलेलं नागरिकशास्त्र नव्याने शिकण्याची आणि आत्मसात करण्याची गरज आहे.

मला समजलेला राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे अस आहे.कदाचित माझ्यापेक्षा तुमच्या संकल्पना वेगळ्या असतील ,कदाचित तुमची मत बरोबर असतील माझी चूक असतील पण तरीही मला तुमच्या मतांचा आदर असेल आणि तुमच ह्या देशातल ,समाजातल सहअस्तित्व मला पूर्णपणे मान्य असेल.

#प्रजासत्ताक_दिन

#आयडिया_ऑफ_इंडिया
MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post