का वाटत असतं नेहमी हरवतंय काहीतरी ?

का वाटत असतं नेहमी हरवतंय काहीतरी,
प्रत्येक क्षणाला वाटतं निसटतंय काहीतरी.
भाव कलात्मक पाषाणातील शिल्पकलेचे,
कोरलेले नयनदल पाहूनी वाटे सांगतंय काहीतरी.

का वाटत असतं नेहमी हरवतंय काहीतरी ?

कित्येक उभ्या पाषाणी दैवत्व शोधले आजवर मी,
पण मंदिराच्या पायथ्याशी मात्र हरवतंय काही तरी.
देणग्यांच्या घोषणांनी कित्येक उजळल्या दीपमाळा,
मेणबत्तीच्या उजेडात चिल्लर मोजताना अजूनही
हरवतंय काहीतरी.

खेळ उन्हाळ सावल्यांचा पाहुनी भांबावला जीव,
अजूनही सांजवेळी शुभंकरोतीला हरवतंय काहीतरी.
देत नाही ह्याचसाठी कधी दोष मी ओल्या आयुष्याला,
सापडतं काहीतरी, कधी हरवतंय काहीतरी.

जगले मी माझं आयुष्य स्वच्छंदी मनाप्रमाणं,
मध्यावरती समजलं होतं हरवतंय काहीतरी.
भटकत होते वणवण मी दिनरात्र सुखासाठी,
धावताना मृगजळापाठी हरवतंय काही तरी.

                                                          ✍ जन्मिता


MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post